मगरांसोबत सहअस्तित्व - सावित्रीच्या काठावर

रत्नागिरी व रायगडच्या पावसाळी, गडद हिरव्या परिसरात वाहणारी सावित्री नदी, महाड शहराची  जणू जीवनवाहिनीच. हीच नदी महाडच्या संस्कृती, शेती, मासेमारी आणि जलवाहतुकीचा अविभाज्य भाग आहे. परंतु या नदीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे – येथे आढळणाऱ्या मगरी !

महाबळेश्वर येथून उगम पावलेली सावित्री नदी रायगड जिल्ह्यातून वाहत जाऊन अरबी समुद्रात मिळते. या नदीच्या, महाड परिसरात मगरी (Crocodylus palustris) मोठ्या प्रमाणात आढळतात. २०२३-२४ च्या सर्वेक्षणानुसार येथे १५० हून अधिक मगरींची नोंद झाली आहे.

महाड आणि मगरींचे नाते

महाड परिसरात सावित्री नदीच्या पात्रात वर्षानुवर्षे मगरी दिसतात. सर्वसाधारणपणे या मगरी, खारमाशी मगर (Mugger Crocodile) प्रकारातील आहेत. या मगरी नदीच्या पात्रात, वाळूत किंवा काठावर ऊन खाताना दिसतात. महाडकरांसाठी हा प्रकार रोजचा आहे.

अनेकदा सकाळी-संध्याकाळी नदीकिनारी कपडे धुणारे, पाणी भरणारे किंवा मासेमारी करणारे लोक आणि जवळच पाण्यात डोकावणारी मगर — असा देखावा सहज पाहायला मिळतो.

सहअस्तित्वाचे उदाहरण

महाडमध्ये अनेकदा असे आढळते की मगर जवळ असूनही लोक आपली कामं करतात. मुलांनाही लहानपणापासून सावधगिरीची शिकवण दिली जाते. कातकरी  समाजासह, स्थानिक लोक या प्राण्याचा आदर करतात. पिकनिक, सणसमारंभ, गणपती विसर्जन करताना मगरी देखील नदीत असतात, परंतु  लोक शिस्त पाळून शक्यतो त्यांच्यापासून दूर राहतात. हे खरं तर मानव आणि वन्यजीव यांचं सुंदर सहअस्तित्व दाखवणारं उदाहरण आहे.

धोका आणि शहाणपण

मगरी या मांसाहारी प्राणी असल्यामुळे धोका निर्माण होतोच. तरीसुद्धा महाडकरांनी या वास्तवाशी एक प्रकारे जुळवून घेतले आहे. स्थानिक लोक नदीत उतरताना सावधानता बाळगतात, खोल पाण्यात जाणे टाळतात आणि पावसाळ्यात विशेष खबरदारी घेतात.
मगरींच्या उपस्थितीमुळे काहीवेळा अपघात झाले असले तरी महाडकरांचा सहअस्तित्वावर आजवर विश्वास होता. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे आता मात्र परिस्थिती थोडी बदलत चालली आहे. 

संकटग्रस्त श्रेणीमधे नोंद असलेला प्राणी – मगर

पृथ्वीवर मगरींचे अस्तित्व  लाखो वर्षांपासून आहे आणि तरीसुद्धा त्यांच्या ह्या दीर्घ ‘इतिहासानंतरही’ त्यांचे ‘भविष्य’ मात्र सुरक्षित नाही. आपल्याच शेजारील म्यानमार आणि भूतान ह्या देशांमध्ये ही प्रजाती आधीच नामशेष झाली आहे. आपल्यासाठी देखील ही गंभीर  बाब आहे. कारण भारतात देखील, रेड डेटा बुकच्या माहितीनुसार मगरी,  ‘संकटग्रस्त’ (Vulnerable- VU) श्रेणीमधे नोंदविल्या गेल्या आहेत. आणि ह्याचमुळे भारतात त्यांना,  Wildlife (Protection) Act, 1972 च्या अंतर्गत अनुसूची–१  मध्ये संरक्षण दिले गेले आहे.

मगरींच्या अस्तित्वाला  अनेक धोके आहेत — अधिवास नष्ट होणे, वाढते शहरीकरण, औद्योगिक विस्तार, नदीकाठांवरील अतिक्रमण, अतिमासेमारी, अवैध शिकार, वाळू उपसा आणि जलप्रदूषण. या सर्वांचा परिणाम महाराष्ट्रातील सावित्री नदीवर आणि पर्यायाने येथील मगरींवर  स्पष्टपणे दिसून येतो आहे. नदीत सोडले जाणारे सांडपाणी, प्लास्टिक व रासायनिक प्रदूषण, वाळू उपसा आणि किनाऱ्याची  होत चाललेली धूप, यामुळे मगरींना ऊन खाण्यासाठी, अंडी घालण्यासाठी व विश्रांतीसाठी लागणाऱ्या जागा झपाट्याने कमी होत आहेत. याशिवाय मासळीची संख्या घटल्यामुळे मगर आणि मच्छीमार या दोघांनाही उपजीविकेचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्राचीन प्रजातीचे रक्षण करण्यासाठी नद्यांचे प्रदूषण थांबवणे, वाळू उपशावर नियंत्रण आणणे आणि अधिवासांचे जतन करणे ही काळाची गरज आहे.

संवर्धनाचे प्रयत्न

महाड MIDC मधील Keva Fragrances Pvt. Ltd. या कंपनीने 2024–25 मध्ये वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत जबाबदारी स्वीकारून मगर संवर्धनाचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमात महाड वनविभाग आणि फॉरेस्ट (FORREST- Forest Regeneration and Environmental Sustainability Trust) या संस्थेने सहकार्य केले.

या अंतर्गत एक  विशेष रेस्क्यू केज तयार करून वनविभागाला दिला आहे.  त्यामुळे मगरींचा धोका वाटणाऱ्या किंवा  संघर्षग्रस्त क्षेत्रात असलेल्या मगरींना ह्या पिंजऱ्यामधून अतिशय सुरक्षितपणे, योग्य अधिवासात हलवणे शक्य झाले आहे. तसेच नदीकाठावर काही ठिकाणी माहिती चित्र-फलक उभारण्यात आले आहेत.  ह्या  फलकांद्वारा,  मगरींचे पर्यावरणातील महत्त्व, प्लास्टिकचा वापर टाळण्याची गरज, नद्यांची स्वच्छता आणि मगरींच्या संरक्षण व संवर्धनाबाबतचे  संदेश देण्यात आले आहेत.

हा उपक्रम म्हणजे उद्योग, शासन आणि संवर्धन संस्था यांच्या  यशस्वी भागीदारीचे उदाहरण आहे. ह्या उपक्रमामुळे, हे स्पष्ट होते की विकास आणि  स्थानिक जैवविविधतेचे रक्षण  एकत्रितपणे साधता येऊ शकते.